Ad will apear here
Next
तंत्रज्ञान नसताना तानाजी मालुसरेंवर सिनेमा करणारे कलामहर्षी बाबुराव पेंटर
अजय देवगणच्या ‘तानाजी - the unsung warrior’ सिनेमाचा ट्रेलर पाहिला, तेव्हापासून एक माणूस राहून राहून आठवत असतो.

कोण तो माणूस??? तर कलामहर्षी बाबुराव पेंटर.

बाबुराव पेंटर का आठवतात?? ‘तानाजी - the unsung warrior’ सिनेमाशी त्यांचा काय संबंध?? असे प्रश्न पडणं साहजिक आहे.

कलामहर्षी आठवतात. कारण भारतीय सिनेमा जेव्हा मूळ धरू पाहत होता, रांगण्याच्या परिस्थितीत सोडा, अगदी पाळण्यात होता तेव्हा देशी बनावटीच्या कॅमेऱ्याने बाबुराव पेंटरांनी तानाजी मालुसरे यांच्या भीमपराक्रमावर सिनेमा बनवलेला.

त्या काळी कॅमेरा बाहेरच्या देशात मिळायचा, त्यात तो प्रचंड महाग. म्हणून बाबुरावांनी प्रोजेक्टरचं रिव्हर्स मेकॅनिझम समजून घेऊन स्वतः कॅमेरा बनवलेला. आजच्या घडीला इंटरनेटची ताकद हाताशी आहे, कॅमेराचे सगळे पार्टस् ऑनलाइन विकत मिळू शकतात. असं असतानाही आजच्या तारखेला कोणता पठ्ठ्या स्वतःचा कॅमेरा बनवू शकतो? यावरूनच बाबुरावांनी स्वातंत्र्यपूर्व काळात कॅमेरा कसा बनवला असेल या दिव्याचा अंदाज आपल्याला येईल.


पुढे जेव्हा बाबुरावांकडे पैसे आले आणि अत्यंत महागडा कॅमेरा बाबुरावांनी बाहेरून मागवला. (खरं तर हे पैसेही त्यांनी उधार घेतलेले होते.) कॅमेरा हाती आल्यावर या माणसानं सर्वांत आधी काय केलं असावं??? तर तो प्रचंड महागडा कॅमेरा पूर्णपणे खोलला, आतलं मेकॅनिझम समजून घेतलं आणि परत तो कॅमेरा होता तसा जोडला. 

आजमितीला पाच-पन्नास हजारांचा आपला कॅमेरा तरी आपण असा पूर्णपणे खोलण्याचं धारिष्ट्य दाखवू काय?

कलामहर्षी दिग्दर्शित सुभेदार तानाजी मालुसरेंवरचा सिनेमा मुंबईत जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा एवढी तुफान गर्दी सिनेमाला व्हायला लागली, की देखरेखीसाठी ब्रिटिशांना पोलिसी बंदोबस्त ठेवावा लागला. त्या सिनेमाने तिकीटबारीवर एवढा जबरदस्त गल्ला जमवला, की पहिल्यांदाच ब्रिटिशांची कावळ्याची नजर सिनेमांच्या उत्पन्नावर गेली. आणि त्या सिनेमापासून सिनेमांवर करमणूक कर लादला गेला.

जाता जाता अजून एक रेफरन्स देतो...

कलामहर्षी दिग्दर्शित ‘कीचकवध’ सिनेमात कीचकाचं मुंडकं धडावेगळं होतं हा सीन बाबुरावांनी कसलेही स्पेशल इफेक्ट नसताना असा काही जिवंत केलेला, की ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ‘तुम्ही सिनेमासाठी एक माणूस मारला, तुम्हाला अटक का होऊ नये’ अशी कारणे दाखवा नोटीस पाठवली.

तो सीन एवढा जबरदस्त झालेला, की थिएटरमध्ये माणसं भोवळ येऊन पडायची.

बाबुरावांना दस्तुरखुद्ध ‘कीचक’ ब्रिटिश अधिकाऱ्यांसमोर नेऊन उभा करावा लागला. तेवढ्यावरही समाधान होईना म्हटल्यावर, तो सीन कसा बनवला याचं प्रात्यक्षिक दाखवावं लागलं बाबुरावांना. आणि अशा तऱ्हेने कीचकवध सिनेमानंतर सिनेमावर पहिल्यांदा सेन्सॉर बोर्ड बसलं.

कीचकाचं मुंडकं धडावेगळं कसं केलेलं बाबुरावांनी?

तर, कीचकाची भूमिका ज्यांनी केली त्यांच्या डोक्याचं माप घेऊन हुबेहूब चेहरा कास्ट केला. धडापासून मान वेगळी झाल्यावर रक्त आणि तुटलेल्या नसा दाखवण्यासाठी त्यांनी बकऱ्याचं रक्त आणि आतडी वापरली. आणि भीम-कीचक युद्धाच्या वेळी एका स्पेसिफिक फ्रेमला शूट थांबवून पुढच्या फ्रेमला कीचकाच्या डोक्यावर काळा पडदा टाकून धड लटपटत एका बाजूला खाली पडतं तर ते नकली बकऱ्याच्या रक्तात आणि आतड्यात माखलेलं मुंडकं दुसरीकडे गडगडत पडतं असं दाखवलेलं. त्या काळात एवढे हरहुन्नरी बाबुरावच असू शकत होते. 

दस्तुरखुद्द लोकमान्य टिळकांनी बाबुरावांना ‘सिनेमा केसरी’ ही पदवी दिलेली. (सिनेमा केसरी की चित्रपट केसरी नेमकं आठवत नाही; पण केसरी हा शब्द त्यात होता एवढं नक्की.)

बाबुरावांच्या हयातीतच त्यांच्या स्टुडिओला आग लागली आणि त्यांच्या अनेक सिनेमाच्या निगेटिव्हस् जळून खाक झाल्या. 
बाबुरावांच्या तालमीत मराठी सिनेमांची एक अख्खी पिढी तयार झाली. विष्णुपंत दामले, फत्तेलाल, व्ही. शांताराम ही त्यांच्या काही शिष्यांची नावं. सिनेमा दिग्दर्शक भालजी पेंढारकर, प्रसिद्ध सिनेमा नट सूर्यकांत-चंद्रकांत मांढरे यांच्या करिअरची सुरवातही बाबुरावांच्या पदरीच झालेली. बाबुरावांचे सगळे शागीर्द आज सगळ्यांना माहिती आहेत; पण बाबुराव? त्यांच्याबद्दल आपण किती जाणून आहोत? मागे फिल्म्स अर्काइव्हसचं एक प्रदर्शन लागलेलं. तिथं काही जुन्या सिनेमांवरची पुस्तकं पाहिली. त्यात व्ही. शांताराम यांच्यावर पुस्तक होतं, दामले- फत्तेलाल यांच्यावर पुस्तक होतं; पण बाबुरावांवर एखादं पुस्तक सोडा त्यांचा एखादा फोटोही नव्हता.

मी मागे बाबुरावांवर एक पोस्ट केलेली. 

महाराष्ट्राचं कलाक्षेत्र कपाळकरंटं आहे, महाराष्ट्राची सिनेसृष्टी विचारशून्य आहे !!
दोघंही बाबुराव पेंटरांना विसरले....... !!!!

मी आजही या वाक्यावर ठाम आहे.

जाता जाता एक आगाऊ सूचना...

तिकीटबारीचे सगळे रेकॉर्ड ज्या सिनेमाने तोडले आणि पहिल्यांदा सिनेमांवर करमणूक कर ज्या सिनेमामुळे लादला गेला त्या सिनेमात सुभेदार तानाजी मालुसरे या डोंगरावरून त्या डोंगरावर उड्या मारत नव्हते, नाचत तर नव्हतेच नव्हते. ऐतिहासिक पात्रांची सगळी अदब सांभाळून तिकीटबारीवर दंगा करता येतो हे शिकण्यासाठी मराठी-हिंदी सिनेमासृष्टीनं त्यांच्याच क्षेत्राच्या बापमाणसाचा वारसा घ्यायला हरकत नाही.

(राजर्षी शाहू महाराज आणि राजाराम महाराज यांचे फक्त कोल्हापुरावर नाही, फक्त महाराष्ट्रावर नाही, तर या देशावर अनंत उपकार आहेत. त्यांच्या कारकिर्दीत आणि त्यांच्या दिलदार मदतीवरच ही अशी रत्नं त्या काळी कोल्हापूरच्या मातीत होऊन गेली, ज्यांनी देशाचा पताका आसमंती फडकवला.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZWHCH
Similar Posts
स्त्री-शिक्षणासाठी झटलेल्या श्रीमंत इंदुमती राणीसाहेब राजर्षी शाहू महाराजांच्या स्नुषा श्रीमंत इंदुमती राणीसाहेबांनी स्त्री-शिक्षणविषयक, तसेच अन्य सामाजिक कार्यातून राजर्षी शाहू महाराजांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. ३० नोव्हेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे छत्रपती राजाराम महाराजांच्या तिसऱ्या पत्नी राजसबाई यांच्या पोटी जन्माला आलेले संभाजीराजे हे कोल्हापूर राज्याचे दुसरे छत्रपती. २० डिसेंबर हा त्यांच्या स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्याविषयी...
‘अमेरिकेतील माझ्या बंधू-भगिनींनो’.... स्वामी विवेकानंदांची शिकागो सर्वधर्मपरिषदेतील भाषणे ‘अमेरिकेतील माझ्या बंधू-भगिनींनो’ या संबोधनाने स्वामी विवेकानंदांनी भारताला जागतिक पातळीवर नवी ओळख मिळवून दिली होती. शिकागो येथे १८९३मध्ये झालेल्या जागतिक सर्वधर्मपरिषदेत ११ सप्टेंबर रोजी विवेकानंदांचे ते ऐतिहासिक भाषण झाले होते. त्या भाषणाला १२७ वर्षे होऊन गेली आहेत. त्याच परिषदेत स्वामी विवेकानंदांनी सहा भाषणे केली
बाळासाहेब : एक लेणे...! शिवसेनेचे संस्थापक आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचा २३ जानेवारी हा जन्मदिन. ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी जागवलेल्या त्यांच्याबद्दलच्या या आठवणी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language